नवी मुंबईकडे येणारा गोमांसचा कंटेनर पोलिसांनी पकडला, लाखोंचा मुद्देमाल जप्त
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2018 01:09 PM (IST)
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत साडे एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंढरपूर : हैद्राबाद येथून नवी मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला. संभाजी ब्रिगेडच्या सहकार्याने टेम्भूर्णी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत साडे एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रशांत मोरे यांना एक कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. मोरेंनी लगेचच याची खातरजमा करुन टेम्भूर्णी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा लावला. कंटेनर येताच पोलिसांनी याची तपासणी केली असता पोलिसांना त्यात गोमांस आढळून आले. पोलिसांनी कंटेनरचा चालक आणि सहाय्यकाला ताब्यात घेऊन कंटेनर पोलीस ठाण्यात आणला. कंटेनर चालक आणि सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 31,50,500 रुपयांचा मुद्देमास जप्त केला आहे.