भिवंडी/जालना : जालना जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुराने ठेकेदाराकडून आगाऊ पैसे घेतले होते. परंतु ऊसतोड ठेकेदाराकडून मारहाण झाल्यामुळे त्याचे पैसे न देताच तो भिवंडीत येऊन राहत होता. त्यामुळे ठेकेदारांनी भिंवडीत येऊन त्याचे अपहरण केले. या अपहरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मजुराची सुटका केली असून ठेकेदाराला अटक केली आहे.

मंगेश बाळू थोरात (20) असे या अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. जालन्यातील ऊसतोड मजूर मुकादम विनोद रांक्षे ( 28, मानतोडी, जि. जालना ) आणि भीमा राठोड ( 35, झातखेडा, जालना ) या दोन मुकादमांनी मंगेश थोरात याला सहा महिन्यांपूर्वी उसतोडीच्या कामासाठी बयाना (आगाऊ पैसे) म्हणून 15 हजार रुपये दिले होते. परंतु पत्नीच्या प्रसुतीसाठी अधिक पैशांची गरज असल्याने मंगेशने मालकाकडे अधिक पैसे मागितले. परंतु पैसे न देता मंगेशला बेदम मारहाण करण्यात आली.

मुकादमांनी मारहाण केल्यामुळे मंगेशने उसतोडीच्या कामावर जाणे बंद केले. परंतु मंगेश कामावर यावे असा तगादा मुकादम विनोद रांक्षे व भीमा राठोड यांनी लावला होता. तरिही मंगेश ऊसतोडीच्या कामासाठी गेला नाही. त्यानंतर मंगेश कामासाठी जालन्यातून थेट भिवंडीत आला.

मंगेशने भिवंडीत एका दूध डेअरीत काम करायला सुरुवात केली. परंतु आपले पैसे घेऊन कामावर न आल्याने चिडलेल्या विनोद व भीमा या दोघा मुकादमांनी मंगेशच्या नातेवाईकांकडून भिवंडीत राहत असलेल्या मंगेशचा पत्ता घेतला. 12 जून रोजी दोन्ही मुकादम काही सहकाऱ्यांसह इनोव्हा कार घेऊन भिवंडीत दाखल झाले.

मुकादमांनी भिवंडीतल्या रांजणोली नाका येथून मंगेशचे अपहरण केले. त्याला कारमध्ये जबर मारहाणही केली. त्यानंतर त्याला जालना येथे पळवून नेऊन जालन्यातील एका ऊसाच्या शेतात बांधून पुन्हा एकदा बेदम मारले. मारहाणीनंतर त्याला तिथेच बांधून ठेवले.

भिवंडीतील रांजनोली नाका येथून अपहरण करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या व्हिडीओमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मंगेशचे अपहरण झाल्याचे समजताच त्याच्या मेहुण्याने कोनगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

पोलिसांनी एका पथकासह जालन्यातील मंठा येथे जाऊन विनोद आणि भीमा या दोघांच्या मुसक्या आवळल्या, तसेच मंगेश थोरातची सुखरूप सुटकादेखील केली. तर विनोद आणि भीमा या दोघा अपहरकर्त्यांना अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ऊसतोडीचे आगाऊ पैसे घेऊनही कामावर न आल्यामुळे एका मजुराचे दोन मुकादमांनी अपहरण केले. अपहरणानंतर त्याला जालना येथे पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपहरणप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.