मुंबई : ममता कुलकर्णी... सिनेमांमध्ये आपल्या हटके अदांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव समोर येतंय.

 

अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी ड्रग्ज माफिया आहे. त्यामुळं ममताभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे.

 

ड्रग्ज प्रकरणात ममताच्या पतीचं नाव समोर


 

ममता कुलकर्णी या नव्वदच्या दशकात चित्रपटांमध्ये जलवा दाखवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण 2 हजार कोटींच्या इफेड्रिन ड्रग्ज प्रकरणात ममताचा नवरा विकी गोस्वामीचं नाव समोर येतं आहे.

 

एवढंच नव्हे, तर ममताचा चेहरा आणि नाव वापरून विकी गोस्वामीनं ड्रग्जच्या धंद्यात चांगलाच जम बसवलाय,  अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.

 

अमेरिकन तपास यंत्रणाही विकी गोस्वामीच्या मागावर

 

ममता कुलकर्णीचा नवरा विकी गोस्वामी हे ड्रग्ज तस्करीतलं मोठं नाव आहे. 1997 मध्ये ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात विकीला दुबईत 15 वर्षांची शिक्षा झाली. सुटका झाल्यानंतर विकी आणि ममता केनियातील नैरोबीमध्ये स्थलांतरीत झाले. तिथंही त्याच्यावर ड्रग्जच्या तस्करीचे आरोप लावण्यात आले आहेत. अमेरिकेच्या तपास यंत्रणा देखील विकी गोस्वामीच्या मागावर आहेत.

 

पतीचे काळे धंदे ममताला माहित नाहीत?

 

पती विकी गोस्वामीचे हे काळे धंदे ममता कुलकर्णीला माहित नाही का? आणि जर तीला या सगळ्या गोष्टी माहित असतील तर ती नवऱ्याला ड्रग्ज तस्करीत मदत करतेय का? अशा अनेक प्रश्नांनी आता डोकं वर काढलं आहे.

 

विकी गोस्वामीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

 

आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेनं विणलेलं जाळ पाहता विकी गोस्वामीला नैरोबी सोडणं शक्य नाही. कारण इंटरपोलनं देखील त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. मात्र, ड्रग्ज तस्करीप्रकरणी विकीबरोबर ममता कुलकर्णीचं नाव देखील समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

 

आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दूध का दूध और पाणी का पाणी करण्याचं आव्हान ठाणे पोलिसांसमोर आहे.

 

पाहा व्हिडीओ