वाशिम : दशरथ मांझीची फगुनिया डोंगरावरुन तोल जाऊन कोसळते आणि सुरु झाला एक संघर्ष... डोंगर फोडून रस्ता बांधण्याचा. मांझींनी जो संघर्ष केला, त्याचा फायदा आख्ख्या गावाला झाला.

 

इकडं वाशिम जिल्ह्यातही दुष्काळानं एका मांझीला जन्म दिला आहे. नाव आहे बापूराव ताजणे. गाव कळंबेश्वर. या पठ्ठ्यानं आख्खी विहीरच खोदली. तीही एकट्यानं. रणरणत्या उन्हात दीड महिना काबाड-कष्ट करुन.

 

बापूराव यांनी विहीर खोदायला सुरुवात केल्यावर आख्खं गाव त्याला हसत होतं. केवळ शेजाऱ्यानं पाणी दिलं नाही, म्हणून विहीर खोदणं लोकांना वेडगळपणा वाटला.

 

बापूरावांच्या विहिरीला अवघ्या 15 फुटांवर पाणी लागलं. आख्खं गाव आता पाणी भरायला लोटतं. बापूराव कुणाला विरोध करत नाहीत, कुणाकडून एका रुपयाची भरपाईसुद्धा घेत नाहीत.

 

कालपर्यंत दुसऱ्याच्या विहिरीसमोर, नळासमोर रांगा लावायला लागायच्या, तिथं पोराच्या कष्टाला फळ आल्याचं बघून बापूरावांच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले.

 

बापूरावांकडं पैसा नाही, पण कुणीही मोल करु शकणार नाही, असं दिलदार मन आहे. जिद्द आहे. कष्टाची तयारी आहे. लोकांसाठी मनात अपार करुणा आहे. माणसाला ग्रेट बनवण्यासाठी यापेक्षा वेगळं काही लागत नाही.

 

पाहा व्हिडीओ