नाशिक : आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला आहे. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली.


पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा आज सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला.

खरं तर गेल्या 4 दिवसांपासून ही मुलं भर पावसामध्ये पुण्याहून चालत निघाली होती. आपल्या साध्या मागण्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा इरादा होता. पण पोलिसांनी शांततेत चाललेल्या या विद्यार्थ्यांवर दंडुकेशाही सुरु केली.

या विद्यार्थ्यांची दखल घेतलेल्या एबीपी माझा या एकमेव वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धमकावलं. त्यांच्या कॅमेऱ्याची नासधूस केली आणि काही काळ डांबूनही ठेवलं. एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली.

शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणं हा गुन्हा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास विद्यार्थी आले होते. पोलीसही तिथे आले. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा बातमी कव्हर करण्यासाठी गेले. त्यांनाही जवळ जाऊ दिलं नाही. त्यानंतर एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी हे घटनास्थळी गेले. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना मुकुल कुलकर्णी आणि किरण कटारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय कॅमेराची नासधुस केली.

पोलीस विद्यार्थ्यांच्या जवळही कुणाला जाऊ देत नव्हते. प्रत्येक गाडीची तपासणी करत होते. पोलीस सर्वांना विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्यासाठी प्रवेश नेमका का नाकारत होते, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

मोर्चा जसा जसा नांदूरच्या जवळ आला, तसे पोलीसही वाढत आले. लवकर निघण्याची घाई केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्व विद्यार्थी 18 तारखेला नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तलयासमोर जमणार होते.

आदिवासी विद्यार्थी आणि पत्रकारांसोबतचा हा प्रकार लोकशाहीच्या विरोधातला आहे. या अन्यायाविरोधात विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.