अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. पण प्रतीक्षाच्या हत्येला जितका राहुल जबाबदार आहे, त्यापेक्षा अधिक अमरावतीचं पोलीस दल... याबाबत माझाचा विशेष रिपोर्ट..

प्रतीक्षाच्या आईचा आक्रोश काळजाला घरं पाडणारा आहे. कारण ज्या राहुल भडने प्रतीक्षाला भर रस्त्यात भोसकलं, तो तिला गेली अनेक वर्ष त्रास देत होता. अगदी परवाच प्रतीक्षाच्या घरी फोन करुन त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. प्रतीक्षाने पोलीस ठाणं गाठून राहुल भडची तक्रार केली, तिचं म्हणणं कुणीही ऐकलं नाही.

राहुल भड तुला दिसला तर आम्हाला कळव, असं म्हणून पोलिसांनी प्रतीक्षाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. प्रतीक्षा आणि राहुल भड एमएस्सीपर्यंत एकत्र शिकत होते. राहुलशी तिची मैत्री होती. पण राहुलचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. त्याने लग्नाची मागणीही घातली. मात्र प्रतीक्षाने ती फेटाळली. त्यानंतर राहुलने तिचं बनावट फेसबुक अकाऊंट उघडलं. लग्नाचे मॉर्फ फोटो टाकले. लग्नपत्रिका आणि लग्नाचं बनावट प्रमाणपत्र अपलोड केलं.

प्रतीक्षाने त्याचीही तक्रार केली होती. गेल्या दोन वर्षात राहुल भडच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने पाचवेळा तक्रारी केल्या होत्या. पण कारवाई शून्य.. प्रतीक्षाच्या मृत्यूनंतर शहर सुन्न झालंय. मुली सुरक्षीत नाहीत, अशी कुजबूज सुरु झालीय. पण कुटुंबाला सावरण्यासाठी कुणीही पुढं आलं नाही.

प्रतीक्षाच्या हत्येत जितका वाटा राहुल भडचा आहे, तितकाच मुर्दाड आणि अकार्यक्षम पोलीस दलाचाही आहे. त्यामुळे राहुल भडला गजाआड करुन प्रश्न मिटणार नाही, ढिम्म पोलीस दलावरही कारवाईचा दांडपट्टा फिरवणं गरजेचं आहे.