सांगली : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसानीच जबर मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली आहे.

कुपवाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. गणेश दशरथ गंभीरे असे या तरुणाचे नाव असून तो या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाचे हाड मोडले आहे.

शरीरावर मारहाणीचे व्रण उठले आहे. सध्या त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षकासह चार पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी गणेशच्या नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी असा कोणताच प्रकार झाला नसल्याचं म्हटलं आहे. ‘गणेश गंभीरे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात चार ते पाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खानावळ मालक व गंभीरे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार गंभीरे विरोधात 151 अंतर्गत कारवाई केलेली होती. त्याच्या पायाला जी दुखापत झाली आहे. ती खानावळ मालक व त्याच्यात झालेल्या मारहाणीवेळी झाली आहे.’ असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.