बीडः आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे मागील वर्षी झालेल्या शितल पवार या शाळकरी मुलीच्या हत्या प्रकरणाचा तपास थंडावल्याने तिला न्याय मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेला दहा महिने उलटले तरी अद्याप तपास प्राथमिक पायरीवरच असून मुलीचे पालक पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवून मेटाकुटीस आले आहेत.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील पवार वस्तीवर राहणारी शितल ही पंधरावर्षीय मुलगी सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता धारदार शास्त्रांनी तिची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पोलिस अजून खूनाचं कारण शोधण्यातच दंग
शितलची हत्या पाळत ठेवून झाली, की ओळखीच्या व्यक्तीने अत्याचारास विरोध केल्याने तिचा खून करून आरोपीने ओळख लपवली, या दृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांनी शाळेत, शेजारीपाजारी, कुटुंबीयांची सखोल चौकशी केली. मात्र, आरोपींपर्यंत पोहचण्यास सपशेल अपयश आलं.
याबाबत शितलच्या आई-वडिलांनी काही संशयितांची नावे पोलिसांना दिली. त्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र, हाती ठोस काही लागले नाही. कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहचता येत नसल्याने आष्टी पोलिसांनी मुलीचे आई-वडील व संशयित अशा सात जणांची ब्रेन मॅपिंग, नार्को अॅनालिसीस व लाय डिटेक्टर चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
नार्को टेस्टसाठी 10 महिन्यांनीही मुहूर्त नाही
लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी मुंबईच्या कलिनामधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रितसर अर्जही करण्यात आला आहे. मात्र, दहा महिने उलटले तरी अद्याप या टेस्टला मुहूर्त मिळाला नाही. या विलंबामुळे पोलिसांनी अद्याप दोषारोपपत्रही दाखल केलं नाही.
पोटचा गोळा गेलं ते दुःख वेगळंच. मात्र न्याय मिळण्यासाठी शितलच्या आई-वडिलांना पोलिस स्टेशनचे उंबरे झिझवावे लागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं गृह खातं या पीडित कुटुंबाला न्याय देणार का, आई-वडिलांचं दुःख पोलिसांना समजणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.