शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकलं, सरकारकडून मात्र फसवणूक
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 29 Jul 2016 12:26 PM (IST)
जळगाव : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारतचा नारा द्यायला सुरुवात केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनाही सुरु केल्यात. मात्र प्रत्यक्षात त्या योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे भुसावळमधील एका घटनेनं उघड झालं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी एका महिलेला चक्क आपलं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे. भुसावळच्या साकेगावमध्ये राहणाऱ्या सुशीला कोळींची अवस्था लंकेच्या पार्वतीसारखी झाली आहे. पती हयात असतानाही सुशीला कोळींना मोकळ्या गळ्यानं वावरावं लागत आहे. सरकारनं केलेल्या फसवणुकीमुळे त्यांना स्वतःचं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे. स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालय बांधण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल, असं कोळी यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. सरपंचानं सांगितलं की शौचालय बांधा, सरकारी योजनेतून पैसे मिळवून देतो. त्यामुळे आम्ही शौचालय बांधल्याचं त्या सांगतात. खुद्द गावच्या सरपंचांनीच गळ घातल्यामुळं कोळी कुटुंबानं पदरचे पैसे खर्च करुन शौचालय बांधायचं ठरवलं. खरं तर बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शौचालयाचा खर्च परवडणारा नव्हता. त्यासाठी सुशीला यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून सावकारासमोर पदर पसरला. शौचालय बांधून पूर्ण झालं... सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी देखील केली. मात्र कोळी यांना शौचालय योजनेचे पैसे मिळाले नाहीत. गेल्या 7 महिन्यांपासून ते ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. एबीपी माझानं यासंदर्भात ग्राम विकास अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, 2 महिन्यांत सुशिला कोळी यांना योजनेचे पैसे मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी मोदींचं सरकार तुमच्या आमच्याकडून कर वसूल करतं. मात्र असं असतानाही, सुशीला कोळी सारख्या गरजूंना शौचालयासाठी मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?