अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडी सोसायटीच्या निवडणुकीवेळी महादेव शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात आपली वरिष्ठांनी साधी चौकशीही केली नाही, असं शिंदे यांनी सांगितलं आहे. 'एबीपी माझा'ने त्यांच्याशी संवाद साधला.

मारहाण झाल्यानंतर वरिष्ठांकडून चौकशी सोडा मात्र दवाखान्यात जाण्यासाठी सरकारी वाहन देखील देण्यात आलं नाही, असा खुलासा शिंदेंनी केला आहे. गृहराज्य मंत्री चौकशीसाठी नगरला आले खरे, मात्र ते आपल्याला भेटलेच नाही, असा खुलासाही शिंदेंनी केला.

दवाखान्यात जाण्यासाठी सरकारी वाहनही मिळालं नाहीः शिंदे

''निवडणुकीत मी रांगेत उभे राहण्यास सांगितल्याचा राग आल्याने मारहाण केली. तीन वर्षांपासून त्याच गावाच्या बीटवर काम करतोय. काही जण सोडवायला आले, मात्र काहींनी पूर्वीच्या कामाची खुन्नस काढली.

निवडणूकीत ते काहीही करतात. पूर्वीही निवडणुकीत वाद झाला होता. निवडणुकीसाठी अत्यंत कमी बंदोबस्त होता. मला 15 ते 20 लोकांनी मारहाण केली. मारहाणीमुळे पोटात सुज आली आहे, त्यामुळे प्रचंड त्रास होतोय.

डायबेटिस आणि हृदयविकाराचा त्रास आहे. माझा आजार सर्वांना माहीत होता. माझ्यावर दारु पिण्याचा आरोप केलाय. मात्र डॉक्टरांना तसं काही आढळून आलं नाही. मारहाणीनंतर अर्धा तासांनी पोलीस मदत आली. मात्र पाथर्डी पोलिस ठाण्यातून हॉस्पिटलला जाण्यासाठी सरकारी वाहन मिळालं नाही. त्यामुळं दुसऱ्याच्या दुचाकीवर उपचारासाठी गेलो.''

गृहराज्य मंत्री नगरला आल्याचं टीव्हीवरुन समजलः शिंदे

''माझी वरिष्ठांनी कोणीही चौकशी केली नाही. गृहराज्य मंत्री दिपक केसरकर हे मला टीव्हीवरुन नगरला आल्याचं समजलं. त्यांनीही संपर्क केला नाही. मी नावं सुचवलेल्या नावांवरही गुन्हा दाखल झाला नाही. मारहाण करणाऱ्यांची नावं गाळण्याचा प्रयत्न होत आहे.

त्या गावात मी तीन वर्षांपासून काम करतोय. त्यामुळं पूर्व वैमन्यासातून माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यामुळं मला पुढील काळात त्रास होण्याची भीती वाटते. मला न्याय भेटल असे वाटत नाही. ज्यांनी मदत केली त्यांनाही त्रास दिला जातोय.

घटनेनंतर मला पाथर्डीतही थांबू दिलं नाही. माझ्या आणि कुटुंबाच्या मनात अजून दहशत आहे. बदली करावी किंवा राजीनामा द्यावा असा विचार सतावतोय. अजूनही भीती आहे की, हे लोक मला मारल्याशिवाय राहणार नाहीत. खरंच पोलिस असुरक्षित आहेत.''

काय आहे प्रकरण?

पाथर्डीत अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी मतदान टेबलाजवळील गर्दी झाली. त्यामुळे शिंदे यांनी मतदारांना रांगेत उभे राहण्यास सांगितलं आणि काठी उगारली. त्यावेळी झालेल्या शाब्दिक  वादावादीनंतर गर्दीतील एकाने शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली.

संबंधित बातम्याः

पाथर्डीतील पोलिस मारहाण प्रकरणी भाजपचे सहा कार्यकर्ते अटकेत


अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण