कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील घोडावत उद्योग समूहाचे संजय घोडावत आणि त्यांचे बेळगावमधील भागीदार निलेश बागी यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी मुंबईतून धमकी देणाऱ्या रमेश कुमार ठक्करला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार व्ही पी सिंह पळून गेला आहे. एका बड्या उद्योजक आणि त्यांच्या भागीदारांना खंडणीसाठी धमक्या देण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


पाच कोटीसाठी धमकीचे फोन आल्यानंतर संजय घोडावत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ सापळा रचून धमकी देणाऱ्यापैकी एकाला अटक केली आहे. संशयित ठक्करने 13 जून ते 18 जून या कालावधीमध्ये संजय घोडावत यांच्याशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधला. तो कधी व्हॉट्सअप कॉलिंग, टेक्स्ट मेसेज आणि वेगवेगळ्या फोनवरुन संपर्क साधत होता. ही सगळी माहिती घेऊन कोल्हापूर पोलिसांनी मुंबईत सापळा रचला. खंडणीतील पैशाची काही रक्कम घेऊन मुंबईतील एका हॉटेलवर बोलावले होते. ती रक्कम पोलिसांनी एका व्यक्तीकडून पाठवली. पैसे ताब्यात घेत असतानाच कोल्हापूर पोलिसांनी रमेशकुमार ठक्करच्या मुसक्या आवळल्या. या सापळ्यात रमेशकुमार ठक्कर अलगद सापडला.


रमेशकुमार ठक्करकडून पोलिसांनी एक लाख रक्कम आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. जीएसटी चुकवून तुम्ही कर्नाटक सरकारची फसवणूक केली आहे. आपल्याकडे या संदर्भातले कागदोपत्री पुरावे आहेत. जर पाच कोटी रुपये दिले नाहीत तर ते पुरावे कर्नाटक सरकारला देणार असल्याची धमकी ठक्कर आणि त्याच्या साथीदाराने दिली होती. या प्रकरणात अटक केलेला संशयित रमेशकुमार ठक्कर हा मूळचा गुजरातचा आहे. तर त्याचा साथीदार व्ही. पी सिंह दिल्लीचा आहे. त्यामुळे यांच्या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.