मुंबई: देशात नव्या अर्थक्रांतीचे वारे वाहत असताना, त्या बदलांना सामोरे जाताना जनतेला अपेक्षेपमाणे अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश एटीएम बंद असल्यानं आज सकाळपासून ग्राहकांनी बँकांसमोर गर्दी केली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरातल्या बँकांसमोर पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.
दरम्यान, बँकेत धाव घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलिसांनी आवाहन केलं आहे.
बँक ग्राहकांना पोलिसांचे आवाहन
- नोटा बदलण्यासाठी बँकेत जाताना रक्कम जास्त असल्यास भक्कम अशा बॅगेत पैसे व्यवस्थित ठेवावेत.
- घरातून किंवा कार्यालयातून पैसे घेऊन निघाल्यानंतर थेट बँकेत जावे, कुठेही मधे स्वीकारणार
- मोठी रक्कम असल्याल, आपल्यासोबत मदतीला कुणाला तरी घ्यावं, पैशाची बॅग डिक्कीत सुरक्षित असल्याची खात्री करावी
- बँकेत नोटा मोजत असताना भामट्यांपासून सावध राहावे, नोटा मोजण्याच्या, बदलून देण्याच्या बहाण्याने फसवणूक होऊ शकते.
- बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्याकडेच किंवा कांऊटरवरच पैसे द्यावेत, मदतीसाठी कर्मचारी किंवा पोलिसांची मदत घ्या.
- ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा अपंगांनी शक्यतो पैसे भरताना किंवा काढताना कर्मचाऱ्यांची, पोलिसांची मदत घ्यावी.
दरम्यान, झालेली कोंडी फोडण्यासाठी शनिवारी आणि रविवारीसुद्धा देशातील सगळ्या बँका उघड्या ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळं नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी रविवारीही बँकेत जाता येणार आहे.