महड (रायगड) : एखाद्याला त्याच्या रंगावरुन हिणवणं किंवा स्वयंपाक न येण्यावरुन हिणवणं किती महागात पडू शकतं, याचं भयंकर उदाहरण रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये समोर आले आहे. घरगुती कार्यक्रमप्रसंगी जेवणात महिलेने विष टाकले. यामुळे जवळपास 120 जणांना विषबाधा झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे,  तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील सुभाष माने यांच्या घरगुती कार्यक्रमप्रसंगी 120 गावकरी आणि नातेवाईकांना विषबाधा झाल्याने खळबळ माजली होती. 18 जून रोजी रात्री झालेल्या या घटनेमुळे 5 जणांचा बळी गेला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

विषबाधेच्या या घटनेचा तपास पोलीस पथक करीत होत. यावेळी ही विषबाधा ही किटकनाशक वापरल्याने झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरविली. यामध्ये सुभाष माने यांची नातेवाईक असलेली प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे ही महिला तब्बल दोन ते तीन दिवसांनी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावरुन पोलिसांचा संशय बळावला आणि आरोपी जाळ्यात आला.

आरोपी ज्योतीने  कौटुंबिक वादातून हा प्रकार केल्याची कबुली दिली असून तिला तिचा रंग, स्वयंपाक न येणं, तिचा विवाह मोडणं अशा कारणांचा राग मनात आल्याने तिने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. यासाठी तिने कार्यक्रमाच्या दिवशी जेवणातील वरणामध्ये किटकनाशक टाकल्याने विषबाधा झाल्याची कबुली दिल्याने तिला अटक करण्यात आली आहे.