Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभूमिवर प्रत्येक जिल्ह्यांना केंद्र सरकार मार्फत सूचना करम्यात आल्या आहेत. कोरोना महामारीसारखी परिस्थिती उद्भवू नये, त्यासाठी भारत सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


केंद्र सरकारनं चीनमधल्या लहान मुलांच्या श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर  आला आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्वतयारी आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळाची तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश देण्यात आले आहे.  


चीनमधील लहान मुलांमध्ये न्युमोनिया होण्याचे कारण प्रामुख्याने इन्फ्युएन्झा, मायकोप्लाझा आणि सार्स कोव्हिड-१९ असल्याचं निरीक्षणात समोर आले आहे. देशाला आणि राज्याला देखील धोका जरी नसला तरी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


सर्व जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांनी सारी सर्वेक्षण करत रुग्णांची नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये कोव्हिड खाटांची तयारी, आॅक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, आॅक्सिजन प्लांट, सिलेंडर कार्यान्वित आहेत की नाही याची खातिरजमा करण्याचे आदेश दिलाय. 


सारी सर्व्हेक्षणातील रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांना पाठवावे, सोबतच काही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्ही पुण्याला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये कोव्हिड प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्यात. औषधसाठा आणि इतर साधनसामग्री देखील उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. क्लस्टरींग आॅफ केसेस आहे की नाही याची खातिरजमा करण्याचे आवाहन केलेय. श्वसन संसर्ग असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याबाबत भर देण्याचे देखील आवाहन केलेय. 


जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले ?


चीनने डब्ल्यूएचओला (जागतिक आरोग्य संघटना) दिलेल्या माहितीनुसार, नवीन फ्लू स्ट्रेन किंवा इतर विषाणूंचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण श्वसनाचे आजार होय. याबाबत डब्ल्यूएचओने सांगितले की, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी टेलिकॉन्फरन्स दरम्यान या आजारासंदर्भातील माहितीचा डेटा मिळाला. त्यामुळे ऑक्टोबरपासून विषाणूचा संसर्ग, आरएसव्ही, इन्फ्लूएंझा आणि सामान्य सर्दीसह आजारांमुळे मुलांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.