मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयानं आणखीन एका दिवसाची वाढ केली आहे.


एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी मधला सव्‍‌र्हे क्र. 52/2 (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी या मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंदही केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि उकानींच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबिय सरकारनोंदी कागदोपत्री मालक झाले आहेत. मात्र या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. 


या प्रकरणात अखेर खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आणि त्याच रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांना न्यायालयानं आधी त्यांना 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या कोठडीत 19 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर सोमवारी कोठडी संपत असल्यानं गिरीश चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं. तेव्हा, या प्रकरणातील गैरव्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध आहे. त्यासंदर्भात पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या चौकशीसाठी चौधरी यांच्या कोठडीत आणखीन तीन दिवसांची वाढ देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. मात्र त्यांची ही मागणी अमान्य करत न्यायालयानं चौधरी यांच्या ईडी कोठडीत केवळ आणखीनं एका दिवसाची वाढ केली.