मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. यावर आता वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून मुदतवाढ मागितल्याचं कळतंय.


पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये त्या व्यवहारावर निर्बंध घातले होते. आता हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.


काय आहे प्रकरण?
वर्षा राऊतांना आलेली ईडीची नोटीस ही पीएमसी बँकेतील 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी आहे. यासंबंधी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँक खात्यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. हे सर्व प्रकरण एचडीआयएल या कंपनीशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं एचडीआयएलच्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती.


वाधवान कुटुंबाने या बॅंकेकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं आणि त्याची परतफेड केली नाही. या वाधवा कुटुंबाच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत हे संजय राऊताच्या खास मित्रांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय. प्रवीण राऊतांची पत्नी माधुरी यांच्या अकाउंटवरुन 55 लाख रुपये संजय राऊतांच्या पत्नीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैसा का ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती ईडीला हवी आहे. यासाठी ईडीने त्यांना नोटीस पोठवली असल्याचं समजतंय.


संजय राऊतांनी 2016 साली राज्यसभा खासदारपदाच्या निवडणुकीवेळी जे शपथ पत्र जाहीर केलं होतं त्यात या व्यवहाराचा उल्लेख सापडतोय. अलिबागच्या किहिम बीचवर राऊत परिवाराने एक संपत्ती खरेदी केली असल्याचं समजतंय. किहिमच्या समुद्र किनाऱ्यापासून 600 मीटर अंतरावर बिगर शेती असणारे 10 प्लॉट खरेदी करण्यात आले होते. या जमिनीची मालकी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावे आहे असं सांगितलं जातंय.


कोण आहेत प्रवीण राऊत?
संजय राऊतांचे नाव ज्या प्रवीण राऊतांशी जोडण्यात आलंय त्या प्रवीण राऊतांना फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रवीण राऊतांच्या पत्नीकडून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आलेले 55 लाख रुपये कोणत्या हेतूने ट्रान्सफर करण्यात आले होते याचं उत्तर ईडीला हवंय. प्रवीण राऊत हे वाधवान कुटुंबाचे जवळचे मानले जात असल्याने या व्यवहाराची माहिती ईडी घेत आहे.


प्रवीण राऊत यांची गोरेगाव येथे 'गुरु आशिष' नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी असल्याचं सांगण्यात येतंय. याच कंपनीच्या माध्यमातून प्रवीण राऊत यांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्यांना फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती आणि त्यांच्यावर विविध गुन्हे नोंद करण्यात आले होते. प्रवीण राऊतांची कन्स्ट्रक्शन कंपनी ही पीएमसी घोटाळ्याशी संबंधित आहे अशी ईडीला शंका आहे.


म्हाडाच्या घरांची बेकायदेशीर विक्री
ईडीच्या सूत्रांच्या मते प्रवीण राऊत यांच्या कंपनीशी म्हाडाने एक करार केला होता. त्यानुसार म्हाडाचे 600 पेक्षा जास्त फ्लॅट्स विस्थापितांना द्यावं असं सांगण्यात आलं होतं. परंतु सरकारी नियम धाब्यावर बसवून प्रवीण राऊतांच्या कंपनीनं या फ्लॅट्सची विक्री परस्पर केल्याचं सांगण्यात येतंय.


वाधवान कुटुंबाची माहिती तपासताना ईडीला प्रवीण राऊतांच्या या व्यवहारांचा तपास लागला. त्यावर अधिक तपास करता वर्षा राऊतांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलं. प्रवीण राऊतांची चौकशी केली असता याबद्दल समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे या आधी दोन वेळा वर्षा राऊतांना ईडीने नोटीस पाठवल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी जर वर्षा राऊत हजर झाल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी ईडीनं ठेवल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय.


या व्यवहारांवर संजय राऊत यांनी अद्याप विस्तृत खुलासा केला नाही. ईडीने वर्षा राऊतांना पाठवललेल्या नोटीसीवरुन मोठं राजकारण सुरु असल्याचं चित्र आहे.


महत्वाच्या बातम्या: