31st July Headline : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 10 ऑगस्टपर्यंत एनडीएच्या सर्व 430 खासदारांशी संवाद साधणार आहेत. तर, राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनिल मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. लोकसभेच्या बिजनेस सल्लागार समितीच्या बैठकीत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची एकूण वेळ आणि दिवस ठरवला जाऊ शकतो. तसेच मणिपूरच्या मुद्यावरून आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे. मणिपूर दौऱ्याहून परतलेले खासदार तेथील सद्यस्थितीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात.
लोकसभा निवडणुक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अँक्शन मोडवर
लोकसभा निवडणुक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अँक्शन मोडवर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 10 ऑगस्टपर्यंत एनडीएच्या सर्व 430 खासदारांशी संवाद साधणार आहेत. मोदी गटाने खासदारांची भेट घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. खासदारांचे 11 गटात करण्यात आलेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी खासदारांशी संवाद साधून ग्राउंड फीडबॅक घेणार आहेत, तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा मंत्र देणार आहेत.
शरद पवार आज पुण्यात येणार
पुणे – शरद पवार आज पुण्यात येणार आहेत. मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र पुण्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मोदींना पुरस्कार देण्यास विरोध करण्यात येणार आहे. बाबा आढाव त्याचे नेतृत्व करणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवारांनी सहभागी होऊ नये अशी त्यांना विनंती करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांना भेटणार आहेत. मोहन जोशी, राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा त्यात समावेश असणार आहे. सकाळी पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या घरी ही भेट होईल.
राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणावर माझगाव कोर्टात सुनावणी
मुंबई – खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणावर माझगाव कोर्टात सुनावणी. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टानं समन्स बजावलंय. 'सामना' या राजकीय मुखपत्रात शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचं हे प्रकरण आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलंय. दोघेही हजर राहणार अशी माहिती, त्यांच्या वकिलांनी कोर्टाला दिलाय.
मुंबई – राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनिल मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आधीच्या मुख्य याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतल्यानंतर दुसऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जायची मुभा दिली होती. त्यानुसार आता सुनील मोदी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आजसाठीच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण आहे. आज सुनावणी झाली तर आमदार नियुक्तीबाबत स्थगितीवर कोर्ट काय म्हणणार याकडेही लक्ष लागले आहे.
राज्यात पावसाचा अंदाज
राज्यात मागील एका महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं बघायला मिळालं आहे. अनेक जिल्ह्यांनी सरासरी देखील गाठली आहे. भारतीय हवामान विभागाकडून जुलै महिन्यासंदर्भात जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान ऑगस्ट महिन्यासंदर्भात काय परिस्थिती राहिल, यासंदर्भात भारतीय हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येणार आहे. आयओडी पॉझिटिव्ह असला तरी अल निनोचा प्रभाव वाढताना बघायला मिळेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यात कशी परिस्थिती असेल हे बघणं महत्त्वाचे असेल.
कोल्हापूर
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील महिलांच्या सामाजिक संघटना आज महानिषेध मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता, ताराराणी चौक ते अंबाबाई मंदिरापर्यंत मोर्चा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मशाल पेटवून एल्गार पुकारला जाणार आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी नदी काठावर असलेल्या पिकांचे नुकसान झालय. याचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यासंदर्भात प्रशासन काय पावलं उचलणार आहे? सर्वात जास्त ऊस पिकाचे नुकसान यंदाच्या पावसामध्ये झालं आहे.
रत्नागिरी
जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील कोंढरन गाव, त्या गावच्या आठवणी आता इतिहास जमा होणार आहेत. याचं कारण म्हणजे गावातील जमीन आणि डोंगर खचू लागला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी आमचं सरकारनं आमच्याच जागेत पुनर्वसन करावं. पुनर्वसनासाठी लागणारी जागा उपलब्ध आहे असं गावाकऱ्याचे म्हणणं आहे. गावातील डोंगर आणि जमीन खचू लागल्यानंतर सध्या या लोकांची जवळच्या गावातील शाळेत तात्पुरता राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, भविष्यातील धोका ओळखून आणि घडत असलेल्या दुर्घटना पाहता कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार कसा प्रतिसाद देणार? हे पहावं लागेल. आज याच विषयावर सकाळी 11 वाजता गावकरी एकत्र सभा घेणार आहेत.
जळगाव
जिल्ह्यातील केळीला आता आखाती देशात ही मागणी निर्माण झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी मोठा दिलासा ठरला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यात एकट्या रावेर तालुक्यातून पाचशे कंटेनर इराण, अफगाणिस्तान, दुबई आणि ओमान या देशात रवाना झाल्याने कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन भारतात आले आहे. या देशात मागणी मोठी असल्याने शेतकऱ्यांना मालाच्या प्रती नुसार एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.