मुंबई : सध्या देशातच नव्हे तर जगभरात अब्जाधीस मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम तसेच या कार्यक्रमांना हजेरी लावणारे पाहुणे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मात्र ते विवाहाच्या दुसऱ्या दिवशी मोदी वधू-वराला शुभाशीर्वाद देण्याची शक्यता आहे.
अनंत-राधिका यांना मोदी देणार शुभाशीर्वाद
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ते 12 जुलै रोजीच्या विवाह सोहळ्यात मोदी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. पण मोदी 13 तारखेला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईत येतील तेव्हाच ते अनंत आणि राधिका यांना शुभाशीर्वाद देतील, असे सांगण्यात येत आहे.
दिग्गज नेतेमंडळी लग्नाला राहणार उपस्थित
या विवाहसोहळ्याला देशभरातील सर्वच प्रमुख पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आदी नेते या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. विशेष म्हणजे बहुसंख्या मंत्री, परराष्ट्र राजनैतिक अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सिनेसृष्टीतील अनेकांची हजेरी
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभाला हजेरी लावली होती. ठाकरे परिवाराचे काही व्हिडीओ समोर आले होते. इतरही अनेक नेतेमंडळींनी या हळदी समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींनीही या कार्यक्रमांना हजेरी लावली. यामध्ये यामध्ये जुन्याजाणत्या तसेच नवख्या कलाकारांचाही समावेश आहे.
हेही वाचा :