मोदी म्हणाले 'हाऊ इज द जोश?', कलाकार म्हणतात 'हाय सर'
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2019 11:28 PM (IST)
कलाकारांनी देखील 'हाय सर' म्हणत त्यांच्या डायलॉगला प्रतिसाद दिला. यावेळी टाळ्यांचा कडकडाटही झाला. यानंतर तुमच्या या नव्या जोशाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. नव्या भारतासाठी तुमचा हा जोश खूप महत्त्वाचा आहे, असेही मोदी म्हणाले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित कलाकारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी उरी चित्रपटातील अभिनेता विकी कौशलचा डायलॉग 'हाऊ इज द जोश?' म्हणत उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी उपस्थित कलाकारांनी देखील 'हाय सर' म्हणत त्यांच्या डायलॉगला प्रतिसाद दिला. यावेळी टाळ्यांचा कडकडाटही झाला. यानंतर तुमच्या या नव्या जोशाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. नव्या भारतासाठी तुमचा हा जोश खूप महत्त्वाचा आहे, असेही मोदी म्हणाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब : मोदी प्रधानमंत्री यावेळी म्हणाले, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत.जे आपल्याला समाजात दिसते ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा सिनेमा हा आरसा आहे, सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्ष लागली यावरून त्याची ओळख व्हायची आता मोठमोठे सिनेमे कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते. जेव्हा चांगली कला, कलाकार आणि साहित्यकार कलाकार एकत्र येतात तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करीत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज वेगवेगळ्या विषयावर आत्मचरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित सिनेमा बनणे आवश्यक आहे. भारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्वाचे केंद्र असून या संग्रहालयादवारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्टीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्वाचे आहेत. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या धर्तीवर इज ऑफ सिनेमा सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार तर मिळतोच पण यामुळे पर्यटन क्षेत्राचीही वृद्धी होत आहे. यापुढील काळात भारतात सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना चित्रीकरणासाठी देशांतर्गत परवानगी तातडीने मिळावी यासाठी सिंगल विडों क्लिअरन्स सिस्टीम उभारण्यात येत आहे. लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून एनएफडीसीबाबत परवानग्या मिळणार आहेत. इज ऑफ डूइंग बिजनेसच्या धर्तीवर आता इज ऑफ सिनेमाची संकल्पना यामुळे रुजण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही ते म्हणाले. पायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार पायरसी रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. श्रम आणि सामर्थ्याचा अपमान पायरसीमुळे होतो. पायरसी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पायरसी रोखण्यासाठी अधिक कडक नियम करण्यात येणार आहे.अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी सुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले. भारतात होणार इंटरनॅशनल फिल्म समिट डाओसमध्ये इंटरनॅशनल बिझनेस समीट होते आता याच धर्तीवर आता भारतात देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. येणाऱ्या काळात भारतात बनत असलेले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी या परिषदेचा नक्की फायदा होईल. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले, मुंबई ही सिनेमा सिटी असून आज सिनेमा सिटी मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरु होणे ही महत्वाची बाब आहे. सिनेमात काम करणारे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधनही करतात ही एक प्रकारची देशसेवाच आहे. येणाऱ्या काळात आपल्या भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जसे कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्कर यासारख्या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी केंद्र शासनामार्फत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.