आंबेनळी बस दुर्घटना : प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करा, पोलीस स्टेशनला घेराव
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2019 07:27 PM (IST)
आंबेनळी बस दुर्घटना : प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करा, पोलीस स्टेशनला घेराव | Ambenali Bus Accident : File a complaint against Prakash Desai, relatives protest in police station
रायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या अपघातामध्ये बचावलेले प्रकाश देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव घातला. प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करा आणि मृत बसचालक प्रशांत भांबेडवरील दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. यावेळी नातेवाईकांसह आमदार संजय कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, खेड नगरपालिका नगराध्यक्ष वैभव खेडैकर हे देखील उपस्थित होते. प्रकाश सावंत देसाई हेच अपघाताला कारणीभूत, मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आंबेनळी बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करा आणि सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी याआधीच केली होती. प्रकाश सावंत देसाई माध्यमांकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ज्या ठिकाणी अपघात होऊन बस दरीत कोसळली, तिथला पूर्ण भाग हा कातळ आहे, तिथे मातीचा लवलेशही नाही, तिथून ट्रेकर्सही सहजरित्या वर चढू शकत नाहीत, मग प्रकाश सावंत देसाई कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात, पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचं प्रकाश सावंत देसाई सांगतात, मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि तोच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला होता. अशा व्यक्तीला विद्यापीठाच्या सेवेत ठेवणं योग्य आहे का? त्यांची नुसती बदली करुन चालणार नाही, तर त्यांना सेवेतून बडतर्फ करुन चौकशी करावी. सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच नार्को टेस्ट करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त नातेवाईकांनी केली होती. आंबेनळी बस अपघात : सहा महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा आंबेनळी घाटातील बस अपघात प्रकरणी सहा महिन्यांनंतर बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 5 महिन्यांपूर्वी 28 जुलै रोजी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालक प्रशांत भांबीड याच्याविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते. बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच 08 ई 9087) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते. प्रशांत भांबेड यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून 31 पैकी 30 जण जागीच ठार झाले. या सहलीसाठी त्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली होती. या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाईलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. संबंधित बातम्या