PM Modi Security Breach :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी पंजाब दौऱ्यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींवरुन राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. या प्रकरणावर पंजाब सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. तसेच या प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, मोदींच्या पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलेय?
पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड  होता  कामा नये.पंजाब दौऱ्यात  मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या  घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी काय झालं होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. मोदींच्या दौऱ्याला पंजाब पोलिसांनी ग्रीन सिग्नलही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."


पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती - चन्नी 
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरचा दौरा नियोजित होता. पण अखेरच्या क्षणी त्यांनी गाडीने जाण्याचं नियोजन केलं. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात 70 हजार खुर्च्या होत्या. पण केवळ 700 लोकच उपस्थित होते."


दोषींवर कारवाई करा - सोनिया गांधी
मोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या तुर्टीनंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत चर्चा केली आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे होती. पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेय.


केंद्रीय गृहमंत्रालयाने झापलं
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरुन केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारला खरमरीत पत्रही लिहिलंय. या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यात कुठे उणीवा झाल्या, कोण दोषी याचा तात्काळ अहवाल द्या असंही बजावण्यात आलंय.