PM Modi Oath Taking Ceremony Live : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होत आहे. आज 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. आपल्या सुनेला मंत्रि‍पदाची संधी मिळत असल्याने ज्येष्ठ नेते यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर यावेळी त्यांचे डोळे पाणावल्याचेही दिसून आले.   


केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना लॉटरी लागली आहे. रक्षा खडसेंना दिल्लीतून फोन येताच रावेरमध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. 


रक्षाताईंनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ - एकनाथ खडसे 


रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, रक्षाताईंना मंत्रीपद मिळत आहे. याचा आमच्या परिवाराला अतिशय आनंद आहे. सलग तीन वेळा रक्षाताई रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यात त्यांनी अत्यंत चांगले काम केलेले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्मही चांगली राहील. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे रक्षाताई आज उच्चपदापर्यंत जाऊ शकल्या. आमच्या परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. रक्षाताईंनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाबरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे  हे आपल्या परिवारासह रक्षा खडसेंच्या शपथविधीसाठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. 


काय म्हणाल्या रक्षा खडसे? 


माझी राजकारणाची सुरुवातच एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे. एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असे रक्षा खडसे यांनी म्हटले. 


आणखी वाचा


Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास