NDA Cabinet Ministers List नवी दिल्लीदेशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्या निमित्ताने राजधानी दिल्ली सजलेली आहे. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. तर आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील 12 जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे.

यात राज्यातील भाजपचे नेते नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, तर आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले, शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने  एनडीए सरकारमधील उच्चपदस्थ नेत्यांनी फोना फोनी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. 

शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची केंद्रात मंत्री पदी वर्णी? 

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड अभेद्य राखणाऱ्या प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची देखील वर्णी लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीए सरकारमधील उच्चपदस्थ नेत्यांनी प्रतापराव जाधव यांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच या बाबत सुतोवाच करत मेरिटच्या आधारे मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रतापराव जाधव हे सर्वात वारिष्ठ आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. एकुणात पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास असून आज त्यांच्या नावे मंत्रीपद येण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

कोण आहेत खासदार प्रतापराव जाधव?

नाव: प्रतापराव गणपतराव जाधव.

जन्म - 25 नोहेंबर 1960 .

जन्म - मेहकर , जि.बुलढाणा.

पत्नी - सौ.राजश्री जाधव.

मुलं - दोन , एक मुलगा , एक मुलगी.

शिक्षण - बी.ए. ( द्वितीय वर्ष )

व्यवसाय - अडत दुकान आणि शेती.

पत्ता - मातोश्री निवास , शिवाजीनगर मेहकर ,जी बुलढाणा

राजकीय प्रवास  

  • 1995 ते 2009  - आमदार , मेहकर विधानसभा
  • 1997 ते 1999  - क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.
  • 2009  - बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून  निवड.
  • 2009 ते 2024  सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.
  • 2009 ते 2024  - अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम

बुलढाणालोकसभा मतदारसंघाचा निकाल (Buldhana Lok Sabha Result 2024)

उमेदवाराचं नाव पक्ष  विजयी की पराभूत?
प्रतापराव जाधव महायुती (शिवसेना शिंदे गट ) विजयी
नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडी (शिवसेना ठाकरे गट) पराभव 
रविकांत तुपकर अपक्ष (शेतकरी नेते) पराभव 
संदीप शेळके अपक्ष (बुलढाणा वन मिशन) पराभव 
वसंत मगर वंचित बहुजन आघाडी  पराभव 

इतर महत्वाच्या बातम्या