सांगली : भारतात नकली अंडी विकली जात असल्याच्या बातम्या यापूर्वी येत होत्या. मात्र सांगलीमध्ये नकली अंडी आढळल्याने खरंच बाजारात नकली अंडी विकल जात आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अंडी खवय्यांची चिंता वाढली आहे.


सांगलीत प्लास्टिकची बनावट अंडी आढळून आली आहेत. मिरज तालुक्यातील बुधगावमधील ज्ञानेश्वर नगर यांनी प्लास्टिकची बनावट अंडी आढळून आल्याचा दावा केला आहे. ज्ञानेश्वर यांनी आपल्या घरा जवळच्या दुकानातून अंडी खरेदी करुन उकडायला लावली होती. मात्र अंडी फुटू लागली आणि भांड्यात फेस तयार होऊन प्लॉस्‍टिक जळाल्या सारखा वास येऊ लागला.


शंका आल्याने त्यांनी पुन्हा खात्री करण्यासाठी दुसऱ्या दुकानातून अंडी आणून उकडायला लावली. ती अंडी चांगली निघाली. मग पुन्हा त्यांनी पहिल्या दुकानातून अंडी विकत घेतली आणि पुन्हा तोच प्रयोग केला. त्यावेळी अंडी बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


बनावट अंड्यावरील चमक, खरबरीतपणा, अंडे हलवून पाहिले असता प्रमाणापेक्षा जास्त आवाज येत होता. अंडी फोडून पाहिले असता पिवळा आणि सफेद बलक वेगळा न दिसता एकरुप झालेला दिसला. अंडी उकडताना ती फुटून भांड्यातील पाण्यात फेस तयार होवून वास येऊ लागला. उकडलेली अंडी रबरासारखी ताणली जात होती, अशी माहिती ज्ञानेश्वर यांनी दिली.


मात्र ती अंडी खरंच प्लास्टिकची आहेत का? याची कोणतीही तपासणी करण्यात आली नसून सांगलीच्या ज्ञानेश्वर यांनी तसा दावा केला आहे. त्यामुळे बाजारात खरंच नकली प्लास्टिकच्या अंड्यांची विक्री सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनच्या तपासणीनंतर तथ्य समोर येईल.


VIDEO |  राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट



आणखी वाचा