मुंबई : मुंबईसह राज्यभरात आज प्लॅस्टिकबंदीच्या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र, कारवाईदरम्यान मुंबईत महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत.
ज्या दुकानदारांकडून दंडाची वसुली होत आहे त्यांच्या मनात प्लॅस्टिकबंदीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत नेमकी माहिती न देता सरसकट कारवाईला विरोध होत आहे. कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि कोणत्या नाही त्याबाबत पुरेशी महिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचं दुकानदार सांगत आहेत.
दरम्यान या प्लॅस्टिकबंदीबाबत सर्व सामान्य जनतेची काळजी जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हालाही आहे असा टोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनसेला लगावला आहे. तर या प्लॅस्टिक बंदीवरून राजकारण न करण्याचा सल्लाही रामदास कदमांनी राजकारण्यांना दिला आहे. तर सर्वपक्षियांनी भविष्याचा धोका टाळण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
राज्यात कुठे कशी कारवाई :
मुंबई
मुंबईत 617 ठिकाणी अधिकाऱ्यांनी व्हिजिट्स दिल्या. यातील 40 ठिकाणी प्लास्टिक आढळले.
अधिकाऱ्यांनी 38 ठिकाणी दंड लावला आहे तर 2 ठिकाणी दंड न दिल्यानं केस दाखल करण्यात येणार आहे.
कारवाईदरम्यान 485 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 1 लाख 90 हजाराचा दंड वसूल कऱण्यात आला आहे.
मालेगाव
महापालिकेतर्फे आज तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. दंडापोटी प्रत्येकी 5000 प्रमाणे 15000 रुपये अधिकाऱ्यांनी वसूल केले आहेत.
परभणी
परभणीत महापालिकेने तीन जणांवर कारवाई केली आहे. यात एकूण 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
भिवंडी
आज रविवारी महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दंड रक्कम शनिवारी वसूल केलेली 40 हजार इतकीच आहे.
नंदुरबार
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकावर नंदुरबारमध्ये कारवाई करण्यात आली. नवापुरात दुसऱ्या दिवशी पाच हजार रूपयांचा दंड वसूल कऱण्यात आला आहे. तर एकूण 77 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
चंद्रपूर
आज प्लास्टिकविरोधात एकही कारवाई नाही.
प्लास्टिकबंदीविरोधात पुण्यात व्यापाऱ्यांची बंदची हाक
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे स्वागतच आहे. मात्र, या नियमामुळे व्यावसायिकांमध्ये गोंधळ आणि कारवाईची भीती निर्माण झाली असल्याचं म्हणत सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने सोमवारी बंद पुकारला आहे. सर्व व्यावसायिकांनी या बंदात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सरकारने प्लास्टिकबंदी करताना सरसकटीकरण केले आहे. कोणते प्लास्टिक वापरायचे आणि कोणते नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही त्याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. प्लास्टिकबंदीचा मिठाई, डेअरी आणि फरसाण व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. प्लास्टिकबंदी करताना सरकारने पर्यायही उपलब्ध करून दिलेला नाही.
प्लास्टिक वापराविरोधात सर्वाधिक कारवाई पुण्यातच केली जात आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणाविरोधात असोसिशनने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. सरकारने धोरण न सुधारल्यास बेमुदत बंद करण्याचा इशाराही असोसिएशनतर्फे देण्यात आला.
प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम, प्रशासनाकडून कारवाई सुरुच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 05:29 PM (IST)
मुंबईसह राज्यभरात आज प्लॅस्टिकबंदीच्या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र, कारवाईदरम्यान मुंबईत महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -