मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात 2020-21 या वर्षातील ‘माझी वुसंधरा ‘ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायाती, नागरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांचा, अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विभाग,जिल्ह्यांचा व अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या 2020-21 या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या आयुष्यातील पर्यावरणाचे महत्व वेगळ्याने सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बिएचके टुबीएचकेसारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा असा ध्यास आपल्या जीवनाला घातक ठरत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपण पंचमहाभूतांपासून दूर जात असल्याचे सांगतांना त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकमत गाजवत असल्याचेही म्हटले. कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सीजनचे महत्व पटले, आपण ऑक्सीजन निर्मिती करत आहोत. पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सीजन प्लांट आपण उध्वस्त करत चाललो आहोत, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती. त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा झाली. नागपंचमीला नागांची पुजा केली जाते. आपल्या पुर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले. परंतू आता आपल्या घरासमोर साधे तुळशीवृदांवन बांधण्याला जागा नाही. इतक्या इमारती राक्षसासारख्या उभ्या राहात आहेत आणि आपण विविध दिनांच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देत आहोत. परंतू या शुभेच्छांचा कोरडेपणा थांबून जैवविविधतेने समृद्ध अशा महाराष्ट्राला जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.
कांदळवनात भव्य अशी जीवसृष्टी दडलेली आहे, वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्व आणि त्याचे रुप आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या सर्व पुरस्कार्थींचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तसेच या अभियानात सहभागी होऊन उत्तम काम करणाऱ्या आणि सहभाग नोंदवणाऱ्या गाव – शहरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहभागीदारांचा त्यांनी गौरव केला. पर्यावरण रक्षणाचे काम एका विभागाचे नाही तसेच ते एका खात्यासाठीही नाही हे मानवकल्याणाचे आणि राज्य आणि देशाच्या हिताचे काम आहे. त्यातून आपलेच जीवन सुसह्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी निसर्गाचे हे देणं जपण्यासाठी निसर्गावरचे आपले अतिक्रमण थांबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करतांना लावलेले वृक्ष जगवले जावेत, सागरतटीय किनाऱ्यांचे रक्षण व्हावे, त्या माध्यमातून पर्यावरणातील सर्व घटकांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बंदर विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि गाव आणि शहर पातळीवर अभियानात सहभागी होऊन काम करणारे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :