मुंबई : विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने  परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या आहेच. आता सीईटी (CET) प्रवेशापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्याचा विचार आहे. कागदपत्रे नसल्यामुळे विद्यार्थी अपात्र ठरल्यास पडताळणी करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पाटील यांनी दिली आहे.

Continues below advertisement


विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक  झाली.


विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचणी आल्या तर त्या विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. प्रवेशाच्या अगोदर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी वेळेत झाली पाहिजे. तसेच सीईटी कक्षाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी जी माहिती असते ती विद्यार्थ्यांना अचूक आणि सुलभरित्या अगोदरच ऑनलाईन उपलब्ध करून दिली तर विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि  विद्यार्थी तयारीला लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि प्रवेश घेताना होणाऱ्या चुका कमी होऊन प्रवेश वेळेत होतील. विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे ही सुविधा सीईटी कक्षाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तातडीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहीजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


काही ठिकाणी प्रवेश होतात आणि नंतर कागदपत्रे पडताळणी मध्ये विद्यार्थी अपात्र ठरतो. हे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्रवेशापूर्वी त्या विद्यार्थ्यांची पूर्ण कागदपत्रे पडताळणी वेळेत आणि अचूक झाली पाहिजे. प्रवेशानंतर विद्यार्थी अपात्र ठरला तर कागदपत्रे पडताळणी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले.