'लिव्ह-इन' पार्टनरचं लग्न ठरल्याने तरुणीची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2018 10:34 AM (IST)
पिंपळे सौदागरमध्येच तीन दिवसांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विवाहित इसमाने चाकू हल्ला करुन तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वत:वरही हल्ला केला.
पिंपरी चिंचवड : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये घडली. आत्महत्येचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ईश्वरी पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव होते. गेल्या तीन वर्षांपासून आयटी कंपनीत कामाला असलेला योगेश सोनावणे हा तरुण ईश्वरी पवारसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत होता. ईश्वरी हडपसर येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. तरुणाचं नुकतंच लग्न ठरले असल्याने ईश्वरी नैराश्यात होती. 'माझ्याशी लग्न कर' असा तगादा तिने योगेशकडे लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पिंपळे गुरव इथल्या राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारली. तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पिंपळे सौदागरमध्येच तीन दिवसांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विवाहित इसमाने चाकू हल्ला करुन तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वत:वरही हल्ला केला. ही घटना ताजी असताना आता दुसरी घटना समोर आल्याने 'लिव्ह इन रिलेशनशिप' चांगली की वाईट याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.