मुंबई : चंद्रपुरात ट्रेनच्या धडकेत वाघाच्या तीन बछड्यांचा करुण अंत झाल्यानंतर अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे. 'ह्यांना देशातील जंगलं नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचे आहेत. ही हत्या आहे' अशा शब्दात रविनाने चीड व्यक्त केली आहे.

रविना टंडन मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. महाराष्ट्रात वन्यजीवांना हक्काचा नैसर्गिक अधिवास मिळावा, यासाठी ती कार्यरत आहे. चंद्रपुरात बछड्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर रविनाचा चांगलाच संताप झाला आणि तिने ट्विटरवरुन आपल्या रागाला मोकळी वाट करुन दिली.

बछड्यांच्या मृत्यूची बातमी कोट करत 'आणि ह्यांना देशातील जंगलं नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचे आहेत. ही हत्या आहे' असा घणाघात रविनाने पहिल्या ट्वीटमधून केला. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडमुळे अशाप्रकारच्या आणखी अपघातांना आपण निमंत्रण देत असल्याचं भाकितही वर्तवलं.




'एका जंगलातून दुसरीकडे जाण्यासाठी अंडरपास बांधले, तर असे अपघात टाळता आले असते. किंवा जंगलाला कुंपण घातलं असतं, तरी वाघांचे बछडे आज जिवंत असते' असं रविनाने तिसऱ्या ट्वीटमध्ये सिंगापूरमधील एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.




तीन बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दोन्ही बछडे अंदाजे सहा ते आठ महिन्यांच्या मादी होत्या. त्यानंतर आणखी एक बछडा जवळच्या झुडपात मृतावस्थेत आढळला.

जुनोना जंगल परिसरात एक वाघीण आपल्या बछड्यांसोबत रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. त्यावेळी बल्लारपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने तिच्या बछड्यांना जोरदार धडक दिली.

विशेष म्हणजे बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर दोन्ही बाजूला अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक वाघ, बिबटे, रानगवे, चितळ आणि रानडुक्कर यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या हा सर्वत्र चर्चेचा आणि आनंदाचा विषय आहे. सरकार हे आकडे सांगून स्वतःची पाठही थोपटून घेतं. मात्र अपघातामुळे वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.