पिंपरी चिंचवड : तरुणीची हत्या करुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील सांगवीमध्ये घटली आहे. आदिती बिडवे असं 19 वर्षीय मृत तरुणीचं नाव असून नाजिमुद्दीन शाह असं 21 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तरुण आणि तरुणी मूळचे लातूरचे होते. तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची शक्यता आहे. त्यानंतर तरुणी पुढील शिक्षणासाठी सांगवी इथल्या चुलत्याकडे राहायला आली होती. तर नाजिमुद्दीन नोकरीसाठी जात असल्याचं सांगून काल पुण्यात आला होता.
तिचे चुलते कामावर, सख्खा भाऊ परीक्षेला आणि चुलत भाऊ गाडी दुरुस्तीसाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी नाजिमुद्दीन तिच्या घरी आला. त्याने वायरच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिथेच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज सांगवी पोलिसांनी वर्तवला आहे.