मुंबई : राज्य सरकारने पणन कायद्यात बदल करणारा अध्यादेश काढल्यामुळे राज्यभरातल्या बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी कायदा नष्ट करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप माथाडी संघटना, व्यापारी आणि कामगारांनी केला आहे. व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये याबाबत प्रचंड संताप आहे. त्यामुळे त्यांनी पुकारलेल्या या संपामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा भासणार आहे. परिणामी भाजीपाल्यांच्या दरांतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र राज्य हमाल-माथाडी महामंडळाने विविध मागण्यांसाठी बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. सर्व माधाडी कामगारांसाठी सार्वत्रिक पेन्शन सुरु करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, युवकांना रोजगार मिळावा, माथाडी कामगार कायदयांसारखे संरक्षण मिळावे, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने सर्व समावेशक समित्यांची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन करण्यात आले आहे.

कालपासून राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद सुरु केला आहे. काल (मंगळवारी) पुणे, मनमाड, नवी मुंबई आणि नागपूर येथील बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर आजपासून राज्यातल्या इतरही बाजार समित्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

संबधित बातम्या : नवी मुंबईतले एपीएमसी मार्केट आज बंद

  :  माथाडी कायदा वाचवण्यासाठी राज्यभरातल्या बाजार समित्या बंद