जालना :  लग्नाआधीच गरोदर राहिल्याने तरुणीचा तिच्याच वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयत तरुणीचे वडील समाधान डुकरेसह चार जणांना अटक केली आहे. छाया डुकरे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धावडा-मेहेगाव रोडवर एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर ही ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली. लग्नाआधी गरोदर राहिल्याने तरुणीचा तिच्या वडिलांनीच नातेवाईकांच्या मदतीने खून केल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

छाया ही पुण्यात शिकत असताना तिचे एका तरुणाशी प्रेम सबंध जुळले. यातून तिला दिवस गेले. हा प्रकार घरी समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी इतर तीन नातेवाईकांचा मदतीने तिचा गळा आवळून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत तरुणीचे वडील समाधान डुकरेसह चार जणांना अटक केली. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.