पिंपरी चिंचवडच्या देहूरोड बाजारपेठेत भाजप नगरसेवकावर गोळीबार
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2019 08:51 AM (IST)
विशाल खंडेलवाल हे देहूरोड कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे नगरसेवक आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या देहूरोडमध्ये भाजप नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार करुन प्रत्यक्षदर्शीवर बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी (13जून) रात्री साडे सातच्या सुमारास भरबाजार पेठेत हा प्रकार घडला. देहूरोड कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल हल्ल्यातून थोडक्यात बचावले. बाजारपेठेतून निघालेल्या विशाल खंडेलवाल यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून राजेश खंडेलवाल घटनास्थळी आले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावरही बंदूक रोखून धरली. विशाल आणि राजेश कसेबसे त्यांच्या तावडीतून निसटल्याने सुखरुप बचावले. पण धावताना विशाल खाली पडल्याने त्यांच्या पायाला जखम झाली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांच्या चिखली इथल्या कार्यालयाची मागील आठवड्यात तोडफोड झाली होती. भरदिवसा नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत तोडफोड करण्यात आली. त्यानंतर काल ही घटना घडली.