Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात आधीपासूनच अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चौकशीत फोन टॅपिंग करताना बोगस नावं वापरल्याची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. फोन टॅपिंग करताना संजय राऊतांऐवजी (Sanjay Raut) एस. रहाटे आणि एकनाथ खडसेंऐवजी (Eknath Khadse) खडासने असा उल्लेख करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, बोगस नावं वापरताना या लोकांच्या नावांशी मिळत्या जुळत्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. 


मुंबई पोलिसांनी सीआरपीसी (CRPC) कलम 164 अंतर्गत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. या 6 जणांमध्ये त्यावेळच्या ACS होम आणि DY SP दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांपैकी जे डीवाय एसपी आहेत, जे त्यावेळी SID मध्ये कर्तव्यावर होते आणि त्यांना या फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन टॅपिंग करताना संजय राऊत आणि एकनाथ खडसेंच्या नावांऐवजी बोगस नावांचा वापर करण्यात आला होता. 


संजय राऊतांचा 60 दिवस तर एकनाथ खडसेंचा 67 दिवस फोन टॅप : सूत्र


संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन 'समाजविघातक घटक' या नावाखाली टॅप होत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात एक पत्र समोर आलं होतं. गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहीलेल्या या पत्रात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन नंबर होते. मात्र त्यांच्या नावापुढे नावं न देता समाजविघातक घटक असं नमूद करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली होती.


यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा सुत्रांमार्फत करण्यात आला होता. संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप होत असल्याचं समोर आलं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचं कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावानं विनंती करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. 


दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचेही जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :