मुंबई : नेत्यांच्या अवैध फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.


सूत्रांनी सांगितले की, पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं.


महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचे कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावाने विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.


दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचेही जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.


भाजपमध्ये असल्यापासूनच माझा फोन टॅप : एकनाथ खडसे
माझा फोन निवडणुकीच्या कालखंडात टॅप केला होता, त्यावेळी मी भाजपमध्ये होतो. विरोधकांचा फोन टॅप करतात याची मला कल्पना होती, पण स्वकीयांचा फोन टॅप करण्याचा नीचपणा कोणी केला याचं मला दु:ख वाटलं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. ज्यावेळी भापजमध्ये होतो, त्यावेळी पक्षामध्ये आपले प्रतिस्पर्धी आहेत, असं ज्यांना वाटलं त्यांनी माझा फोन टॅप केल्याचा माझा संशय आहे, असंही ते म्हणाले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे याचा आग्रह मी केला आहे. केवळ निवडणुकीच्या कालखंडात नाही तर त्याआधीही माझा फोन टॅप झाल्याची लेखी पत्र मुख्य सचिव, गृहसचिवांना दिलं होतं, असंही खडसे यांनी सांगितलं. 


संबंधित बातम्या