सांगली : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. निवडणुका संपल्यावर पेट्रोल-डिझेलचे दर ही वाढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर 118 आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत 125 रुपये, आणखी काही दिवसांनी 150 रुपये सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. सांगलीतील आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
महागाईची झळ सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे, याचा गांभीर्याने विचार करत देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले. पण कर्नाटक किंवा अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग कसं? जो दुष्काळी कर पेट्रोल वर लावलाय तो अजून का कमी केला नाही या प्रश्नांना मात्र जयंत पाटील यांनी सोयीस्करित्या बगल दिली.
सरकार आणि तपास यंत्रणा ही त्यांच्याच
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी एक उदाहरण दिलं. "क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्हाला 11 नाही तर 13 खेळाडूंविरोधात खेळायला लागलं. कारण दोन पंचदेखील आमच्या विरोधात होते. त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ईडी आणि सीबीआय आमच्याविरोधात आहेत. तसाच प्रकार सध्या देशात चालू आहे," असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतुक
श्रीलंका किंवा अन्य शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "त्यांनी त्याठिकाणी नियोजनबद्ध असं काही केलं नाही, यामुळे महागाई वाढली. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भारतात 1991 पासून आदर्श अशी अर्थव्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमती जगात वाढल्या, तरीही भारतात लगेच वाढत नव्हत्या. महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह फंड ठेवला होता. आज तीच व्यवस्था चालू असती, तर भारतातील नागरिकांना सध्याची महागाईची झळ बसली नसती.