Petrol Shortage Maharashtra : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला (New Motor Vehicle Act) मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात पेट्रोल-डिझेल चालकही उतरले आहेत. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातूनच राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची एकच गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा अधिकारी, पोलीस प्रशासनांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.
संप चिघळणार?
आज रात्रीपासून मोटार वाहन चालकांनी संप पुकारल्याने समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावर चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी ट्रक चालक थांबले आहेत. त्याच्या परिणामी समृद्धी महामार्गावर आज वाहतूक कमी दिसून आली आहे.
मुंबई-वडोदरा महामार्गाच्या कामाला फटका बसणार?
पालघर जिल्ह्यातील टँकर चालकांसह इतरही ट्रक चालक आंदोलनामध्ये सहभागी असून विशेष म्हणजे याचा परिणाम पेट्रोल पंपावरही दिसून येणार आहे. जोपर्यंत पेट्रोल पंपावर साठा आहे तोपर्यंत पेट्रोल डिझेल वितरित होईल मात्र सध्या पंपावर डिझेल पेट्रोल पोचवणारे टँकर बंद असून पुढे आंदोलन सुरू राहिलं तर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. पालघर जिल्ह्यातून मुंबई वडोदरा महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या महामार्गावर जेवढे ट्रक कार्यरत आहेत त्यांचे चालक ही आंदोलनात सहभागी महामार्गावर काम बंद होण्याची शक्यता आहे.
नगरमध्ये ही नागरिकांची गर्दी
मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदविला असून या देशव्यापी संपामुळे पेट्रोल आणि डिझेल टँकर येणार नाही अशी चर्चा सुरू झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू शकतो या अफवेमुळे अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील पेट्रोल पंपावर शेकडो नागरिक रांगा लावून पेट्रोल भरण्यासाठी उभे राहिल्याचे चित्र नगर मधील विविध पेट्रोल पंपावर दिसून आले.
सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावर राडा
सोलापूर ग्रामीण पोलिसांद्वारे संचलित पेट्रोल पंपावर ग्राहकांचा राडा झाला. पेट्रोल भरण्याच्या रांगेत वाद झाल्याने वाहनचालकामध्ये वाद उफाळून आला. वाद वाढल्याने पेट्रोल पंप बंद करण्याची नामुष्की ओढावली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. मात्र, रात्री उशिरा पर्यंत सुरु राहणारे पेट्रोल पंप 10 वाजताच बंद झाले आहेत.
वसई पेट्रोल पंपावर एक किमीच्या रांगा
वसईत पेट्रोल पंपावर वाहनधारकांचा हंगामा सुरू आहे. पेट्रोल मिळणार नाही या समजुतीमुळे, वसईतील पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्याएक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. रात्री 9 वाजता पेट्रोल पंप बंद झाल्याने रांगेत असलेल्या वाहनधारकांनी एकच हंगामा करीत पेट्रोल पंप चालू करा असं म्हणतं घोषणाबाजी केली. 4 तासापासून आम्ही पेट्रोल च्या रांगेत उभे आहोत, आमच्या गाडीत पेट्रोल नाही, पंप सुरू करा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.