मुंबई : देशभरातील सामान्य जनता महागाईने भरडली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर  प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. ही  त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना एक प्रकारची दिवाळी भेट दिल्याची चर्चा सुरु आहे. 


 






पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर हे उद्यापासून लागू असतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरच्या एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. 


शेतीचा रबी हंगाम सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना मदत म्हणून डिझेलवरच्या एक्साईज टॅक्सवर पेट्रोलच्या दुप्पट म्हणजे 10 रुपयांची कमी करण्यात आली आहे. राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरच्या VAT करारात कमी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं केंद्राने निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 


देशात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती. त्यामुळे सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशात पेट्रोलने शंभरी गाठलीच आहे पण अनेक ठिकाणी डिझेलनेही शंभरी पार केल्याचं चित्र आहे. आता केंद्र सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).