खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय
शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखिल कम्युनिटी किचन सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या 1 लाख 70 हजार कोटी पॅकेजचे तसेच अन्य उपाययोजनांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे.
बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी चिंताजनक
राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दुधाच्या टँकरमधून प्रवास, पोलिस, डॉक्टरांवर हल्ले चुकीचे
प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.