आता शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र!
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2017 05:34 PM (IST)
मुंबई : सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरुपी ओळखपत्र दिलं जाणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पदही ओळखपत्रावर नमूद करण्यात येईल. तसंच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय व विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. यापूर्वी सेवानिवृत्तांना एक वर्ष मुदतीसाठी ओळखपत्र देण्यात येत होतं, मात्र ते कायमस्वरुपी मिळावे, अशी मागणी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून होत होती. राज्य शासनाकडून ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच कायमस्वरुपी ओळखपत्र सेवानिवृत्तांना देण्यात येणार आहे. या ओळखपत्रामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृती वेतनाबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण होणे, तसंच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी होईल.