नाशिक : नाशिक भाजपमधील बंडखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीवेळी उमेदवारीसाठी पैसे वाटपाची क्लिप व्हायरल झाल्याने भाजपची बदनामी झाली होती. आता निवडणुकीनंतरही आमदार सीमा हिरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपमधील अतंर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
भाजप आमदार सीम हिरे यांनी नाशिक महापालिकेसाठी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. फक्त 1 मत आम्हाला द्या, बाकीच्या 3 उमेदवारांना मत देऊ नका, अशा आशयाची सीमा हिरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे सीमा हिरे यांची तक्रारही केली आहे.
सीमा हिरे यांचे दीर नाशिक महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र त्यांना वगळून प्रभागातील इतर कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मत देऊ नका, असं आवाहन या ऑडिओ क्लिपमधून केलं आहे. तसंच सीमा हिरे यांनी पक्षावर उघड नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र अद्याप या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळलेली नाही.
दरम्यान, घरभेद्यांमुळेच भाजपचा मोठा विजय हुकल्याचं पालक मंत्री गिरीश महाजन यांनी निकालानंतर नवीन नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात म्हटलं होतं.