उस्मानाबाद : आपलं आडनाव हा आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग असतो. कोणाला त्याचा अभिमान वाटतो, तर कोणाला ती त्रासदायक ठरतात. राज्यभरातील काही जणांनी आपल्याला चिकटलेली नकोशी आडनावं दूर सारली. प्राध्यापक हर्षवर्धन संदिपान कांबळे... 2007 साली हर्षवर्धन कांबळे यांचे हर्षवर्धन कोल्हापूरे झाले. इंग्रजी, राज्यशास्त्र या विषयात के पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, तर त्यांनी एलएलबी-बीएडही केलं आहे. लातूरच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात ते शिकवात. नांदेडचा फोटोग्राफर गौतम कांबळे हासुद्धा कंटाळून गौतम गोळेगावकर झाला. नवनाथ कांबळे एक्साईज विभागात कर्मचारी होते. कांबळेंना कोकणात-पुण्यात रहायला घर मिळालं नाही. औरंगाबादला एका चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश मिळाला नाही. कांबळेंनी आपलं आडनाव बदललं. कांबळेचे अणदूरकर झाले. नवनाथ उपळेकर आपल्या आधीच्या आडनावाचा फार त्रास झाल्याचं सांगतात. तर वर्षा उपळेकर या मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचारी आपल्याला खूप तुच्छ लेखलं जायचं, असं सांगतात. मथुर उपळेकर शाळेत आडनावामुळे त्रास दिला जात असल्याची आठवण सांगतात. आडनाव बदल्यामुळे फायदा झाल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. भाऊसाहेब बनसोडेंनी दोन वेळेस आडनाव बदलली. भाऊसाहेब बनसोडे... भाऊसाहेब अणदूकर झाले. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात तपासलं तर शेकडो मागासवर्गीर्यांनी आडनाव बदल्याचं दिसून येईल. व्हॉट्सअॅपच्या आभासी जगाचा नांदेड विद्यापीठाच्या 25 विद्यार्थ्यांनी महिनाभर अभ्यास केला. प्रत्येक जातीचे जहाल ग्रुप्स तयार झाल्याचं यात आढळलं. आपली जात, आपले महापुरूष कसे श्रेष्ठ आहेत, याचे शेकडो मेसेज रोज फिरतात. सजातीय बांधवांवरच्या अन्यायाविरोधात सोशल मीडियावर संघटन होतं. इतर जातींची यथेच्छ हेटाळणी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करुन वर्णव्यवस्थेला मूठमाती दिली. घटनेत समतेवर आधारित व्यवस्था निर्माण केली. पण आडनाव बदलणारी ही माणसं, व्हॉट्सअॅप ग्रुपवर तयार झालेले जातीचे कप्पे पाहता जातीचा वाडा चिरेबंदीच राहिला आहे.