रत्नागिरी : लॉकडाऊननंतर हजारोंच्या संख्येनं लोक सध्या शहरात अडकून पडले आहेत. प्रवासी वाहतूक, रेल्वे, विमानसेवा बंद असल्यानं अनेकांना आपल्या मुळगावी जाता येत नाही. काहींचे हाल देखील होत असल्याचे समोर येत आहे. पण, या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी, खबरदारी घेतली जात आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक असलेले आता आपल्या गावी दाखल होत आहेत. त्यासाठी आता अनेक शक्कल देखील लढवली जात आहे.


कोकणात येण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनी समुद्रमार्गे बोटीचा पर्याय निवडला. याची दखल घेत असा प्रवास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काहींनी तर चक्क कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरून चालत येत आपलं गाव गाठलं. तर, सातारामध्ये कामानिमित्त असलेले काही तरूण, तरूणींनी जंगलाचा रस्ता निवडत आपल्या गावची वाट धरली. शिवाय, कुणी प्रेसचा बोर्ड आपल्या कारला लावत रत्नागिरीत आले. या साऱ्या बाबी समोर आल्यानंतर आता काहींना तर चक्क आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आधार घेत रत्नागिरी गाठणं पसंत केले आहे.


असाच प्रकार आता रत्नागिरी शहरात समोर आला. पनवेल येथून निघालेल्या तिघांनी चक्क आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून रत्नागिरी गाठली. पण, पोलिसांच्या सतर्कपणामुळे हा सारा प्रकार समोर आला. रत्नागिरीत आलेल्या तिघांनी पनवेल ते रत्नागिरी असा प्रवास आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मदतीनं केला होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. शिवाय असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. वेळ पडल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश देखील त्यांनी दिले.


वाहतूकदारांना समज दिली
लॉकडाऊननंतर देखील अत्यावश्यक सेवेचं निमित्त करत काही प्रमाणात रत्नागिरीकर बाहेर पडल्याचं दिसून आलं. या साऱ्यांना समजवण्यासाठी आणि एकंदरीत नियमांची अंमलबजावणी कशारितीने होत आहे, याचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत रस्त्यावर उतरले होते. पनवेलहून रत्नागिरीत तिघेजण आंबा वाहचतूक करणाऱ्या वाहनाच्या मदतीनं दाखल झाल्याचं कळताच याची दखल त्यांनी तातडीनं घेतली. शिवाय, वाहतूक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोलावून घेत घडल्या प्रकाराचा जाब विचारला. तसेच असा प्रकार पुन्हा समोर आल्यास सहन केले जाणार नाही अशा कानउघडणी देखील केली.


पोलिस मित्र यांची भूमिका महत्त्वाची
रत्नागिरीमध्ये सध्या पोलिसांच्या साथीला पोलिस मित्र देखील रस्त्यावर उतरले आहेत. योग्य पास पाहिल्यानंतर नागरिकांचे वाहन पुढे सोडले जात आहेत. जवळपास 40 पोलिस मित्र सध्या सकाळी 8 ते रात्री 8 असे बारा तास काम करत आहेत.