मुंबई : निसर्ग वादाळानंतर कोकणवासियांच्या आयुष्यात अंधार निर्माण झालाय. दोन आठवडे झाले. आजही कोकणवासिय अंधारात दिवस काढतायत, कोण दुसऱ्यांच्या घरी दिवस काढतंय तर कोण शासनाच्या मदतीची वाट बघतंय. डोक्यावर छप्पर नाहीय, घरात चूल पेटवायची सोय नाहीय, सर्व सामान अस्ताव्यस्त पडलंय आणि डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. कोकणाच्या या परिस्थितीचा एबीपी माझाच्या टीमनं ग्राऊंड रिपोर्ट केला, त्यामध्ये ही सत्य परिस्थिती समोर आली आहे.


निसर्ग वादळानंतरच्या दोन आठवड्यानंतरची ही परिस्थिती आहे. निसर्ग चक्रीवादळात दापोली तालुक्यातल्या कर्दे गावातलं पड्याळ कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडलं. करती सवरती एकटी बाई आणि तिला हिम्मत देणारी तिची मुलगी घरात या दोघीच घरात राहतात. निसर्ग चक्रीवादळानं आयुष्य नेलं नसलं तरी आयुष्याची पुंजी, पै पै जमवत उभं केलेलं घर आणि संसाराच्या आठवणी सारं काही नेलं आहे. घराच्या ज्या उघड्या खिडकीत उभे राहून पड्याळ कुटुंब मोकळा श्वास घेत होते. या वादळानंतर ती खिडकीही उघडी पडली आहे. उभी हयात जे उभं करण्यासाठी खर्ची केली ते घरच डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं. उघड्या डोळ्यांनी हताश आणि हतबल होत हे पाहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. पंचनामा झाला पण मदत अजून काही आली नाहीय आजही आम्ही मदतीच्या प्रतिक्षेत आहोत, लवकरात लवकर मदत पोहोचवणार असं सांगतिलं आहे. पण अजून काही मदत पोहोचली नाहीय अशी प्रतिक्रिया पड्याळ कुटुंबियांनी दिलीय.



वादळानंतर अशी झाली अवस्था

घर बांधण्यासाठी अर्धी हयात गेली, जीव मारून गोळा केलेली पुंजी देखील खर्ची केली. पण, निसर्ग चक्रीवादळ आलं आणि सारं घेऊन गेलं. त्यामुळे राहायचं कुठे? हा प्रश्न या कुटुंबासमोर होता कारण प्रत्येकाचा संसार विस्कटला होता. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे या कुटुंबावर पोल्ट्रीत राहण्याची वेळ आली, दोन वेळेचं जेवण आणि
झोपायची सोय कशीबशी त्याच्या शेजाऱ्यांनी केली. पण ही मदत किती दिवस करणार? असा सवाल शेजारी करत आहे. त्यामुळे शासनानं लवकरात लवकर मदत पोहोचवावी अशी अपेक्षा शेजारी करत आहेत.



स्वत:च्या हिंमतीवर कोकण उभं राहतंय

संकट मोठं आहे, पण त्याहून कोकणवासियांची जिद्द मोठी आहे. म्हणून निसर्ग वादळानंतर हळूहळू कोकण स्वत:च्या हिंमतीवर उभं राहतंय. पड्याळ कुटुंबानंही जिद्द सोडली नाहीय. ते हळूहळू घर उभं करतायत. सर्वांच्याच घरांवर अस्मानी संकट कोसळल्यानं कोण पुरुष मदतीला येईल याची त्यांना आशा नाहीय. दोघी मायलेकी हिमतीनं लढतायत. त्यांची हिच हिम्मत बघून आम्हालाही राहावलं नाही. घरात पुरुष मंडंळी नसल्यानं आम्ही माणूसकीच्या नात्यांनं या पड्याळ कुटुंबियांना मदतीचा हात दिला आणि त्याचं घर आवरायला मदत केली
पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पड्याळ कुटुंबियांसारखी बिना आधाराची लोकं अनेक आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. भविष्यात जर कोकणात फिरायला आलात तर नक्की कोकणवासियांना हाक देऊन मदतीचा हात द्या.