मुंबई : भाजपात जुलैमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. कोथरुडची विधानसभेची जागा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवयानी फरांदे यांची महामंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मागच्या सरकारमध्ये आशिष शेलार यांना अखेरच्या काही महिन्यात मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यातही त्यांना शालेय शिक्षण खात्यावर समाधान मानावं लागलं होतं. तर देवयानी फरांदे यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा असूनही मंत्रीपदाची संधी हुकली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने ऊर्जा खातं देऊन विदर्भात चांगलीच ऊर्जा दिली होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कट झाला होता. इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही आयारामांना संधी दिल्याने पक्षातील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजाची सूर होता. मात्र नाराजी असूनही या नेत्यांनी पक्ष-संघटनेविरोधात कधीच उघडपणे टीका केली नव्हती. यामुळेच आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्षाकडून या नेत्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड नवी मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारणीमध्ये झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील त्यांची नवीन टीम घोषित करणे अपेक्षित होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नव्या टीमची घोषणा लांबणीवर पडली. आता जुलै मध्ये नव्याने उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, कोषाध्यक्ष तसंच पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या सर्व फेरबदलामध्ये आता पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष कोणती जबाबदारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.