रायगड : महाड तालुक्यातील आदिवासी मच्छीमारांनी सावित्री नदीतून पकडलेल्या माशांना स्थानिक खरेदी करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तहसीलदारांना पत्र लिहून याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. महाड दुर्घटनेमुळे हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.




मागच्याच महिन्यात महाडमधील सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्यामुळे दोन एसटी बससोबत अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. यात जवळपास 42 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या नदीतील मासे खाणे अपशकुनी असल्याची भीती व्यक्त करत स्थानिकांनी माशांची खरेदी करणं बंद केलं आहे.



"आदिवासींच्या प्रतिनिधी मंडळाने आपली भेट घेऊन राज्य सरकारने या प्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. तसंच रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील मासे खाण्यासाठी सुरक्षित आहेत, पण स्थानिक ते खाण्यास तयार नसल्याने मच्छीमारांनी निवेदन सादर केलं आहे. पुढील कारवाईसाठी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे," अशी माहिती महाडचे तहसिलदार औदुंबर पाटील यांनी दिली.



सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास 42 प्रवासी वाहून गेले होते.  या नदीतील माशांच्या पोटात बुडालेल्यांच्या हाताचे आणि डोळ्याचे अवशेष सापडल्याची अफवाही पसरल्याने सावित्री नदीतील मासे खाणे स्थानिक अपशकुनी समजत आहेत. स्थानिकांनी आदिवासी मच्छीमारांकडून मासे खरेदी करणंही सोडून दिलं आहे. महाड तालुक्यात 6,777 आदिवासी आहेत, पण स्थानिकांनी त्यांच्या व्यवसायाकडे पाठ फिरवल्यामुळे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.