कोल्हापूर : "नियम आणि अटी पाळा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही," असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. "महिनाभर घरात थांबून मिळवलेलं चार दिवसात गमावून बसू, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिक कोरोनाला हरवल्यासारखं बाहेर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो," अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.


आजपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. बरीच दुकानं खुली झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असूनही खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. लॉकडाऊन संपल्यासारखं लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्याचा इशारा दिला.


हसन मुश्रीफ म्हणाले की, " सव्वा महिना लॉकडाऊनमुळे शुकशुकाट होता, आज ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर जणू काही कोरोना संपलेला आहे, हद्दपार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवला आहे अशा थाटात आज कोल्हापूर आणि कागलमध्ये गर्दी दिसली. चार-पाच दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले तर सरकार दुसरं काय करु शकतं? अमेरिका, फ्रान्स, इटली यांच्यासारखे देश जे आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत, आरोग्य सेवेने परिपूर्ण आहे, त्यांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत. रुग्ण वाढले तर आपल्यापुढे एकच मार्ग आहे पुन्हा लॉकडाऊन. लोकांनी स्वयंशिस्त पाळणं आवश्यक आहे. घरात सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे."


ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट भाग वगळता वाईन शॉप सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे सकाळपासूनच मद्यप्रेमींनी खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. परंतु स्थानिक प्रशासनाकडून आदेश आल्याशिवाय दुकानं सुरु करणार नाही, असं काही ठिकाणच्या विक्रेत्यांनी सांगितल्याने ग्राहकांचा मात्र हिरमोड झाला.


Lockdown 3 | नियम आणि अटी पाळा नाहीतर पुन्हा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : हसन मुश्रीफ