Nagpur News नागपूर : देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर शहराच्या (Nagpur City) परिघात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे त्याप्रमाणे अनेक व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve) देखील आहेत. वर्षाकाठी लाखो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असून दिवसेंदिवस भेट देणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ताडोबा, मेळघाट, कान्हा, पेंच इत्यादी सारख्या प्रख्यात व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव प्रेमींसाठी व्याघ्र दर्शनाचे नंदनवनच. अशातच नागपूर नजीकच्या पेंच व्याघ्र प्रकल्प  (Pench Tiger Reserve) आता आणखी एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी प्रकाशझोतात आला आहे. कारण पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता व्याघ्र दर्शनासह आकाशगंगेतील असंख्य तारे उघड्या डोळ्यांनी न्याहाळता येणार आहे.


नुकताच पेंच व्याघ्र प्रकल्प आता वाघांच्या घरासह "डार्क स्काय पार्क" देखील झाला आहे. विशेष म्हणजे देशातील पहिला आणि आशिया खंडातील पाचवा डार्क स्काय पार्क होण्यासाठी पेंचच्या जंगलात कित्येक किलोमीटरचा परिसर प्रकाश प्रदूषण मुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पेंचला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. 


देशातील पहिला तर आशियातील पाचवा डार्क स्काय पार्क


नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क झाला आहे. विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी "डार्कस्काय सेंचुरी" ठरली आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प आता वन्यप्रेमींसह खगोल प्रेमींसाठी आकर्षणाचा खास केंद्र बनणार आहे. मुळातच जंगलात रात्रीच्या वेळेला अंधार असतो. परिसरातील मानवी वस्तीतील कृत्रिम प्रकाश म्हणजेच, विजेचे दिवे, लाइट्स वगळता अनेक किलोमीटरपर्यंत कुठलाही कृत्रिम प्रकाश नसतो. त्यामुळे अशा भागातून खगोलीय, आकाशीय ग्रह, ताऱ्यांचा अवलोकन चांगल्यारित्या करता येतो. जंगल क्षेत्रातील याच नैसर्गिक अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी खगोल प्रेमींसाठी डार्क स्काय पार्क उभारला जातोय.


मात्र, त्यासाठी प्रकाश प्रदूषण म्हणजेच कृत्रिम प्रकाश पूर्णपणे नाहीसा केला जात आहे. त्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात कित्येक किलोमीटरचा संपूर्ण परिसर शंभर टक्के प्रकाश प्रदूषण मुक्त करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वनपरिक्षेत्रात वाघोली, सिल्लारी, पिपरिया, खापा या गावांमधील रत्यांवरील, तसेच लोकांच्या घरासमोरील दिवे हे जमिनीच्या दिशेने फोकस करून बदलून देण्यात आले आहेत.


व्याघ्र दर्शनासह डार्क स्काय पार्कची अनुभूती


डार्क स्काय पार्कमध्ये येणाऱ्या खगोल प्रेमींना रात्रीच्या अंधारात आकाश निरीक्षण करत ग्रह, तारे न्याहाळण्यासाठी पेंच मधील सिल्लारी गेटजवळील बफर झोनमध्ये वाघोली तलावाजवळ खास व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकाश प्रदूषण मुक्त परिसरात एक वॉचटॉवर उभारण्यात आले असून तिथे आकाश निरीक्षणासाठी खास दुर्बिणीची व्यवस्था ही करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवसा पेंच व्याघ्र प्रकल्पात गेल्यावर तुम्हाला वन्यजीव दर्शना बरोबर रात्रीला गडद अंधारात आकाश निरीक्षण ही करता येणार आहे. तसेच पेंचला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या