पुणे : पुणे मेट्रो भूमीपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद निवळला आहे. 24 डिसेंबरला होणाऱ्या मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमीपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमीपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता.

पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा



"भाजप हा सत्तेचा वापर करुन मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत चुकीचा पायंडा पाडत आहे. भाजप कार्यक्रमासाठी दोन स्टेज करुन केवळ राजकीय फायदा लाटण्यासाठी असा उद्योग करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आम्ही विकास कामाबाबत राजकारण करणार नाही. शरद पवार यांच्या हस्ते 23 तारखेला सकाळी उद्घाटन होईल," असं राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आलं होतं.

परंतु मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने 23 डिसेंबरचा भूमीपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द केल्याने, आता पवार-मोदी व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत.