अहमदनगर : पतंजलीच्या उत्पादनाच्या डिलरशीपचं आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. बिहारमधून टोळीचा म्होरक्या राघवेंद्र सिंग उर्फ विकास कुमारला अटक करण्यात आली आहे.

28 तारखेपर्यंत भामट्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, बनावट बँक खात्यासह 91 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत राघवेंद्रच्या खात्यात देशातील विविध ठिकाणाहून 50 लाख जमा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर संदीप कुमार, संतोष कुमार आणि अमित कुमार या तिघा साथीदारांचा तपास सुरु आहे.

राहुरीच्या देविदास दहिफळे यांनी पतंजलीच्या बनावट वेबसाईट वर फॉर्म भरला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात टोल फ्री क्रमांकावर राघवेंद्रशी संपर्क साधला होता. त्यावेळी पंजाब नॅशनल बँकेत डिपॉजिटसह तीन लाख रुपये जमा केले होते. दहिफळे यांना मेलवर पतंजली डिलरशीपचं प्रमाणपत्र पाठवण्यात आलं. त्यानंतर मालासाठी दहा लाखाची मागणी केली. मात्र  संशय बळावल्यानं दहिफळे यांनी चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचं उघड झालं.

या टोळीनं अहमदनगर, धुळे, नाशिक जळगाव आणि पुण्यासह आठ जिल्ह्यातील नागरिकांना गंडा घातला आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये ही नागरिकांना लुटलं आहे. त्याचबरोबर राघवेंद्र हा मोबाईल कंपनीचं टॉवर उभारणी आणि बेरोजगारांना नोकरीचं आमिष दाखवून ही लुटत होता.

पोलिसांच्या धाडीत राघवेंद्रकडे बनावट कागदपत्रांचं घबाडच हाती लागलं आहे. राघवेंद्रकडे 12 मोबाईल, 24 सिमकार्ड, 4 पेनड्राईव, एक लॅपटॉप, 19 एटीएम आणि 10 पासबुक सापडले आहेत. त्याचबरोबर 3 पॅनकार्ड, 2 वाहन परवाना, 2 मतदान कार्ड, 2 आधार कार्ड आणि 10 चेक बुक सापडले आहेत.